छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रावर संशयी पतीने चाकू आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २ जून रोजी टीव्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये घडली. या हल्ल्यात विष्णू बिभिषण आवाड (२७, रा. बार्शी, जि. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सिडको पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली आहे.
पोलीस भरती दरम्यान विष्णू आणि आरोपीच्या पत्नीची ओळख झाली होती. विष्णू अधूनमधून तिला भेटायला संभाजीनगरात यायचा, यावरून पती-पत्नीत वाद होते. २ जून रोजी विष्णूला पुन्हा न येण्याबाबत समजावण्यासाठी पत्नी पतीसह गार्डनमध्ये गेली. मात्र, तिथे विष्णू आणि पतीत जोरदार वाद झाला. यानंतर पतीने पाठीमागून विष्णूच्या गळ्यावर सपासप वार केले आणि प्रतिकार
करत असताना डोक्यात दगड घातला. विष्णू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावर आरोपी पसार झाला. पत्नीने गंभीर विष्णूला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. धक्कादायक म्हणजे आरोपी पती रुग्णालय परिसरातही घुटमळत होता. पत्नीने सतर्कता दाखवत डायल ११२ वरून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions